चिपळूणच्या नवीन बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा वैद्यकीय ओपीडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुनील जांभेकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जांभेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्या चिपळूण बस स्थानकात कै. डॉक्टर साने यांची ओपीडी नियमित सुरू होती. या ओपीडीचा केवळ एसटी प्रवाशांनाच नव्हे, तर एसटी कर्मचाऱ्यांना, हमालांना आणि परिसरातील गरीब जनतेला मोठा आधार होता. प्रवासादरम्यान अचानक एखादा प्रवासी आजारी पडल्यास त्याला तात्काळ उपचार मिळत असत.
मात्र डॉक्टर साने यांच्यानंतर आजपर्यंत बस स्थानकात कोणतीही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. सध्या चिपळूण बस स्थानकाचे नूतनीकरण आणि नवीन बांधकाम सुरू आहे. हीच योग्य वेळ साधून नवीन आराखड्यात वैद्यकीय ओपीडीसाठी एक छोटी जागा राखीव ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवीन बस स्थानकात एखाद्या डॉक्टरांची ओपीडी किंवा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुरू केल्यास हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होईल आणि एक चांगली सुविधा उपलब्ध होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
