रत्नागिरी विमानतळावर आय.एल.एस. (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम) बसवण्यासाठी सुमारे सात एकर जागेची आवश्यकता असून या जागेत स्थानिकांची घरे आणि मंदिर बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आज पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपल्या चिंता मांडल्या.
नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांसमवेत थेट विमानतळ परिसराची पाहणी केली. केवळ कागदावरील नकाशांवर निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पर्यायी मार्गाचा विचार करा – ना. सामंत
“विमानतळाचा विकास हा महत्त्वाचाच आहे, मात्र त्या विकासाच्या नावाखाली कोणाच्याही राहत्या घरावर किंवा श्रद्धास्थान असलेल्या मंदिरावर हातोडा पडू देणार नाही,” अशी ठाम ग्वाही मंत्री सामंत यांनी नागरिकांना दिली.
आय.एल.एस. सिस्टीमसाठी बाधित क्षेत्र कमी करण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दमण विमानतळावर वापरण्यात येत असलेल्या एअरपोर्ट सिस्टीमबाबत तेथील प्रशासनाशी चर्चा करून ती प्रणाली रत्नागिरी विमानतळासाठी लागू करता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. विमानतळाचा विकास आणि स्थानिकांचे हक्क या दोन्हीचा समतोल साधूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
