रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पोस्टाच्या कामासाठी ओळख असलेल्या एका 56 वर्षीय पोस्टमनने 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आहे. या प्रकरणात पीडिता गरोदर राहिल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला आहे. खेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
काय आहे प्रकरण?
खेड पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपी नरेश बाबाजी मोरे (वय 56, रा. आस्तान, ता. खेड) हा पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. पीडितेचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने आरोपीचे त्या कुटुंबाशी चांगले संबंध होते.
आरडीच्या पावत्या लिहणे, हप्ते भरणे तसेच आधारकार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रांचे काम असल्याचे सांगून आरोपीने मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला आणि मुलीला घरी बोलावून घेतले.
तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल 2025 ते जुलै 2026 या दीड वर्षाच्या कालावधीत आरोपीने अनेकवेळा मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. जून 2025 आणि मे 2026 मध्येदेखील तो गावी असताना वेगवेगळ्या कारणांनी मुलीला घरी बोलावून तिची छेड काढल्याचा आरोप आहे.
धमकी देऊन ठेवले गप्प
हा प्रकार कोणाला सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार बराच काळ लपवून ठेवला.
प्रेग्नन्सी टेस्टनंतर उघड झाला प्रकार
गेल्या काही महिन्यांपासून मुलीला मासिक पाळी न आल्याने आणि वागणुकीत बदल झाल्याने आईला संशय आला. सुरुवातीला रक्ताची कमतरता असल्याचे समजले. मात्र 28 जुलै 2026 रोजी प्रेग्नन्सी टेस्ट केली असता मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आईने विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर पीडितेच्या आईने तातडीने खेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा POCSO सह इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
सध्या पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
