संगमेश्वर फुणगुस खाडी परिसरातून वाहणारी शास्त्री नदी सध्या भीतीचं कारण बनली आहे. कारण अवघ्या 48 तासांच्या अंतराने या नदीपात्रात दोन वेगवेगळे कुजलेले मृतदेह सापडले आहेत.
दोन दिवसांपूर्वी डिंगणी रेती बंदर परिसरात परचुरी येथून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. घरचे तिचा शोध घेत असतानाच नदीत मृतदेह सापडल्याने परिसर हादरला होता.
मंगळवारी, 30 जून रोजी दुपारी 4 वाजता राई-भादगाव पुलाखाली आणखी एक मृतदेह तरंगताना दिसला. पोलीस पाटील दीपक सावंत यांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले. हा मृतदेह 30 ते 40 वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा आहे. अनेक दिवस पाण्यात राहिल्याने तो पूर्ण कुजला आहे. ओळख पटत नाही.
एकाच खाडीत, दोन प्रेतं – संशय वाढला
फुणगुस खाडीच्या त्याच भागात दोन दिवसांत दोन मृतदेह सापडल्याने नागरिकांत भीती आहे. दोन्ही मृतदेह सडलेले असल्याने घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले.
संगमेश्वर पोलीस दोन्ही घटनांचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांत परिसरातून कोणी पुरुष बेपत्ता असेल तर तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एका आठवड्यात एकाच नदीत दोन मृतदेह सापडणे हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही? या प्रश्नाने संपूर्ण संगमेश्वर तालुका अस्वस्थ झाला आहे.
