चिपळूण शहरातील नामांकित बँकेचा अधिकारी मुकुंद मुरलीधर पालांडे (वय 33) यांच्या संशयास्पद मृत्यूने चिपळूण पुन्हा हादरलंय! तीन दिवस बेपत्ता असलेल्या मुकुंदचा मृतदेह अखेर कोळकेवाडी धरणाच्या पाण्यात तरंगताना सापडला आणि संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. दरम्यान याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून दोन संशयित आरोपी अद्याप पसार असल्याचे समजते.
4 पानांची सुसाइड नोट आणि धरणात उडी!
बेपत्ता होण्यापूर्वी मुकुंद यांनी 4 पानांची सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली. त्यातून धक्कादायक खुलासे समोर आले. चिठ्ठी लिहून मुकुंद थेट कोळकेवाडी धरण गाठलं. त्यांची दुचाकी धरणाजवळ बेवारस अवस्थेत सापडताच नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला. पोलिसांनी, NDRF ने धरणात शोधमोहीम राबवली आणि रविवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य समोर आलं. मुकुंदचा मृतदेह पाण्यात तरंगत होता.
खंडणी, छळ… आणि आत्महत्या
मुकुंदच्या सुसाइड नोटच्या आधारे शिरगाव पोलिसांनी तातडीने 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. खंडणी मागणी, शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.
पोलिसांची धडक कारवाई: 4 जणांना अटक, 2 फरार
गुन्हा दाखल होताच चिपळूण पोलिसांनी अनोखी खेडेकर, अखिलेश खेडेकर, योगेश मोरे आणि वेदांत टाकले या चौघांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित दोन आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्वतः चिपळूण गाठलं. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील कसून तपास करत आहेत. दरम्यान, शोकाकुल वातावरणात मुकुंद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका होतकरू तरुणाचा असा शेवट पाहून चिपळूणकर सुन्न झालेत.
