कोकणातील माणसं खूप चांगली आणि मदत करणारी आहेत. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच आले, पण इथल्या लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेले,” अशा शब्दांत मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने चिपळूणकरांचे तोंडभरून कौतुक केले. ‘नारी शक्ती पैठणी’ कार्यक्रमानिमित्त युवा उद्योजक अजिंक्य पवार यांच्या निमंत्रणावरून ती काल चिपळुणात आली होती. यावेळी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत तिने करिअर, रिल्स स्टार्स, टाइपकास्ट ते महिलांच्या स्वावलंबनापर्यंत अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.
याआधी सातारा, सांगली, कोल्हापूरला जाणं झालं, पण कोकणात मी पहिल्यांदाच आले. चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात फिरताना लोकांनी जी मदत केली, आपुलकी दाखवली ती मी कधीच विसरणार नाही,” असे भावनिक होऊन जान्हवी म्हणाली.
रिल्स स्टार्सना कमी लेखू नका, त्यांचीही मेहनत आहे
सोशल मीडियावर रिल्स करणाऱ्या नव्या कलाकारांबद्दल ती म्हणाली, “रिल्स स्टार देखील खूप मेहनत करून पुढे येत आहेत. जुन्या काळातील काही कलाकार जे आताच्या रिल्स स्टार्सना नावं ठेवतात ते चुकीचं आहे. प्रत्येकाला संधी आहे. आज जे टीका करतात ते स्वतः ऍक्टर आहेत, त्यांनाही संधी मिळाली होती. रिल्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं, म्हणून त्यांना कमी समजू नये.”
टाइपकास्ट होण्याची भीती, पण लवकरच इमेज बदलणार
“मला टाइपकास्ट होण्याची भीती वाटते कारण माझा स्वतःचा अनुभव आहे,” असे सांगत जान्हवी म्हणाली, “आजपर्यंत मी व्हिलनच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक मला व्हिलनच समजतात. पण प्रत्यक्षात मी तशी नाही. हा गैरसमज लवकरच मी पुसून टाकणार आहे आणि एका वेगळ्या, सकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.”
मराठीत ग्लॅमरला वाव द्या, साउथसारखे चित्रपट हवेत
मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलताना तिने खंत व्यक्त केली. “मराठीत अजून ग्लॅमरला तितकेसे महत्त्व दिले जात नाही. इथे तुम्हाला काय जमतंय, तुमची पात्रता काय यावरूनच काम दिलं जातं. पण आता काळ बदललाय. साउथ किंवा बॉलीवूडसारखे भव्य चित्रपट मराठीतही बनायला हवेत. त्यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घ्यावा, ही माझी इच्छा आहे.”
हिरोईन बनण्याची प्रचंड इच्छा, पण…
“मी लीड रोलसाठी प्रयत्न करते, पण आतापर्यंत मला व्हिलनच्याच भूमिका मिळाल्या. माझी प्रचंड इच्छा आहे की मला हिरोईनचा लीड रोल मिळावा,” अशी खदखद तिने व्यक्त केली.
मूल झाल्यावर करिअर सुरू केलं, मरणही सेटवरच यावं
वैयक्तिक आयुष्याबद्दल ती म्हणाली, “शूटिंग नसेल तेव्हा मी पूर्ण वेळ मुलासोबत घालवते आणि आईची भूमिका पार पाडते. मी लग्नानंतर, मूल झाल्यावर करिअरला सुरुवात केली. मरेपर्यंत हे क्षेत्र सोडणार नाही. उलट माझे मरण सुद्धा सेटवरच यावे, अशी माझी इच्छा आहे.”
‘स्वतःच्या पायावर उभे रहा, नवऱ्यावर अवलंबून राहू नका’
समस्त स्त्री वर्गाला संदेश देताना जान्हवी म्हणाली, “एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. कोणत्याही क्षेत्रात वय आडवं येत नाही, फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. स्वतःच्या इच्छा स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून पूर्ण कराव्यात. त्यासाठी नवऱ्यावर अवलंबून राहू नये.”
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी दिलेली पैठणी ‘स्पेशल डे’साठी जपून ठेवलीय
एका आठवणीला उजाळा देताना ती म्हणाली, “नवरात्र उत्सवात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नींनी मला आमंत्रित केलं होतं. त्यांनी खूप सुंदर आणि महागडी पैठणी भेट दिली. ती मी अजून जपून ठेवली आहे. सेलिब्रिटींना एक साडी एकदाच इव्हेंटला घालता येते, परत घातली की लोक नावं ठेवतात. त्यामुळे माझ्या आयुष्यातला एखादा खास दिवस असेल तेव्हा मी ती पैठणी नेसेन. मला प्रत्येक स्त्रीप्रमाणे साडी प्रचंड आवडते आणि मी प्रत्येक इव्हेंटला साडी नेसूनच जाते.”
