महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘खेळ पैठणी’चा कार्यक्रम रविवारी खेर्डीत दणक्यात पार पडला. सुमारे 350 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने हा सोहळा अक्षरशः ‘हाऊसफुल्ल’ झाला. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला चार चांद लागले.
रवीना गिरामेंना बाईक, सीमा ढवळेंना फ्रीज
या रंगतदार स्पर्धेत रवीना गिरामे यांनी प्रथम क्रमांक पटकावत आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जिंकली, तर सीमा ढवळे यांनी द्वितीय क्रमांकासह फ्रीजची मानकरी ठरल्या. विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
जान्हवी किल्लेकरकडून कार्यक्रमाचे भरभरून कौतुक
कार्यक्रमाला लाभलेल्या मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या उपस्थितीने महिलांचा उत्साह द्विगुणित झाला. पहिल्यांदाच चिपळुणात आलेल्या जान्हवीने कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. “महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे,” असे मत व्यक्त करत तिने कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, दत्तवाडी मित्र मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ व युवा उद्योजक अजिंक्य पवार यांचे विशेष कौतुक केले.
स्वतःच्या पैशातून कार्यक्रम घेणे सोपे नाही”: भास्कर जाधव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत मुक्तकंठाने प्रशंसा केली. “कार्यक्रम तर अनेकजण घेतात, पण स्वतःच्या पैशातून इतका भव्य कार्यक्रम घेणे सोपे नाही. यासाठी अजिंक्य, तुला मानावे लागेल,” अशा शब्दांत त्यांनी अजिंक्य पवार यांची पाठ थोपटली.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तवाडी मित्र मंडळाने केलेले चोख आणि उत्तम नियोजन सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले. नाव नोंदणीपासून बक्षीस वितरणापर्यंत प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. खेळ, गाणी, उखाणे आणि पैठणीच्या झगमगाटात खेर्डीतील रविवार महिलांसाठी ‘स्पेशल’ ठरला.
