कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात सौर ऊर्जेचा वापर करून कोळसा बचत व प्रदूषण घटवण्याचा मार्ग दाखवणाऱ्या संशोधनासाठी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्युत विभागप्रमुख प्रा. सतिश नंदकुमार घोरपडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण कोकणातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
1200 मेगावॅट प्रकल्पावर संशोधन, JSW Energy चे सहकार्य
प्रा. घोरपडे यांनी “Integration of Parabolic Trough Collectors with Existing Coal Based Thermal Power Plant” या विषयावर संशोधन केले. हे संशोधन थेट 1200 मेगावॅट क्षमतेच्या JSW Energy च्या वीज प्रकल्पाच्या संदर्भात आहे. कोळशावर आधारित वीज निर्मितीमध्ये ‘पॅराबोलिक ट्रफ कलेक्टर’ म्हणजेच अवतल आरशांद्वारे सौर ऊर्जा वापरून पाणी तापवण्याचे तंत्रज्ञान जोडल्यास किती कोळसा वाचू शकतो आणि कार्बन उत्सर्जन किती कमी होते, याचा सखोल अभ्यास त्यांनी केला.
या महत्वाकांक्षी संशोधनासाठी JSW Energy ने मोलाचे सहकार्य केले. “कंपनीने दिलेल्या पाठिंब्याशिवाय हे संशोधन पूर्ण होऊ शकले नसते,” अशी कृतज्ञता प्रा. घोरपडे यांनी व्यक्त केली. त्यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
महाविद्यालयात आनंदोत्सव
वेळणेश्वरच्या विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. डॉ. घोरपडे यांच्या पीएच.डी.ची बातमी येताच आनंदाचे वातावरण पसरले. प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. “ऊर्जा क्षेत्रातील हे संशोधन भविष्यात कोकणासह देशासाठी दिशादर्शक ठरेल,” अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी दिली.
कोळसा जाळून होणारे प्रदूषण ही जागतिक समस्या असताना, अस्तित्वात असलेल्या औष्णिक प्रकल्पांनाच ‘ग्रीन’ करण्याचा मार्ग या संशोधनाने दाखवला आहे.
