कोकणात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईच्या कुटुंबाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवणाऱ्या चौघांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी 48 तासांत पनवेलमधून उचलले आहे. आरे समुद्रकिनारी घडलेल्या या माजोरड्या प्रकारामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला काळिमा फासला गेला होता.
नेमकं काय घडलं?
शनिवार 2 मे रोजी दहिसर-मुंबई येथील प्रविण हरिश्चंद्र कोरे (48) हे पत्नी, पुतण्या व कुटुंबासह रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. आरे समुद्रकिनारी जात असताना MH-46-DA-9784 व MH-46-CE-7485 या दोन कारमधील चौघांनी कोरे यांच्या गाडीसमोर गाड्या वाकड्या-तिकड्या चालवून अडथळा निर्माण केला.
कोरे यांनी जाब विचारताच चौघांनी शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी प्रविण कोरे, त्यांची पत्नी आणि पुतण्याला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता चाकू काढून ‘ठार मारू’ अशी थेट धमकी दिली. कुटुंबासह फिरायला आलेल्या पर्यटकांना आलेला हा अनुभव धडकी भरवणारा होता.
गुन्हा दाखल, 48 तासांत आरोपी गजाआड
या प्रकरणी प्रविण कोरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देताच भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 115(2), 351(2), 352, 131, 324(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल झाला.
घटना पर्यटकांच्या सुरक्षिततेला व जिल्ह्याच्या पर्यटनाला बाधा आणणारी असल्याने पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामूनी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांच्या आदेशावरून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने पनवेलला रवाना झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासांत चौघा संशयितांना पनवेलमधून ताब्यात घेतले.
पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांच्या पथकाने केली. जलद तपास करून आरोपींना जेरबंद केल्याने पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला धक्का पोहोचवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. चौघांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
—
