“रात्री झोप लागत नाही, लहान मुलं दचकून उठतात, वृद्धांना बीपीचा त्रास वाढलाय…”चिपळूण मधल्या शिवाजीनगरमधील प्रथमेश अपार्टमेंटमधील 300 कुटुंबीयांची ही व्यथा आहे. कारण आहे – शेजारच्याच महानगर गॅसच्या CNG पंपावर ‘धडधडणारा’ कॉम्प्रेसर. अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या आवाजी अत्याचाराविरोधात अखेर नगरसेविका सौ. अंजली सतीश कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारून ‘अल्टीमेटम’ दिला आहे.
100 डेसिबलचा ‘कानठळ्या’ बसवणारा आवाज
शिवाजीनगर येथील महानगर गॅस पंपालगत बसवलेल्या कॉम्प्रेसरमधून रात्री 99 ते 100 डेसिबलपर्यंत आवाज निघतो. निवासी क्षेत्रासाठी 45 डेसिबलची मर्यादा असताना दुप्पट आवाजाने प्रथमेश अपार्टमेंट फेज 1, 2, 3 मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रक्तदाब, कानाचे विकार, निद्रानाश व मानसिक तणाव अशा तक्रारी वाढल्या आहेत.
“लहान मुलं, वृद्ध, रुग्ण सगळेच त्रस्त आहेत. अडीच वर्ष झाली, प्रशासन झोपलंय का?” असा संतप्त सवाल नगरसेविका अंजली कदम यांनी उपस्थित केला.
प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा, तरीही दुर्लक्ष
या गंभीर प्रश्नावर प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रांत कार्यालय व चिपळूण पोलीस ठाणे यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही महानगर गॅस व्यवस्थापनाने ठोस पावले उचलली नाहीत. अखेर नगरसेवक शशिकांत मोदी व नगरसेविका अंजली कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट व्यवस्थापनाला धारेवर धरले.
तात्पुरता दिलासा, पण कायमचा तोडगा कधी?
नगरसेवकांच्या हस्तक्षेपानंतर महानगर गॅसने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत पंप बंद ठेवण्याचे मान्य केले आहे. तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत विशेष पथकाकडून ध्वनी व वायू प्रदूषणाची अचूक मोजणी करण्याची मागणी मान्य झाली आहे. कॉम्प्रेसरचे स्थलांतर लवकरात लवकर करण्याचे आश्वासनही व्यवस्थापनाने दिले आहे.
“15 दिवसांत कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू”
मात्र केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता नगरसेवक मोदी व नगरसेविका कदम यांनी अल्टिमेटम दिला आहे. “येत्या 15 दिवसांत समाधानकारक तोडगा न निघाल्यास नागरिकांना सोबत घेऊन महानगर गॅस कार्यालय व पंपासमोर आंदोलन व उपोषण छेडू,” असा सज्जड इशारा दोघांनी दिला.
या वेळी पत्रकार सतीश कदम तसेच प्रथमेश अपार्टमेंटचे पदाधिकारी उपस्थित होते. अडीच वर्षांच्या त्रासाने संतप्त झालेल्या नागरिकांनी “आता माघार नाही” अशी भूमिका घेतली असून प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचा सवाल : विकास हवा, पण आरोग्याच्या किंमतीवर?
CNG सारखी पर्यावरणपूरक इंधन व्यवस्था हवीच, पण 300 कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ करून नको, अशी भावना आता शिवाजीनगरमध्ये व्यक्त होत आहे. MPCB आणि महानगर गॅस आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
