मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता थांबेना. शुक्रवारी सकाळी 11:50 वाजता खवटी रेल्वे पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गणपतीपुळ्याला निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. यात दहिसर-मुंबई येथील एकाच कुटुंबातील 4 जण जखमी झाले.
पुलावरून जाताना घात, गाडी महामार्गावर पलटी
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील कोलमकर-सिंग कुटुंबीय गणपतीपुळे दर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने निघाले होते. खवटी रेल्वे पुलावर आल्यानंतर अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि प्रवाशांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर महामार्गावर उलटली. क्षणार्धात झालेल्या या अपघाताने महामार्गावर एकच खळबळ उडाली.
नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे वाचले प्राण
अपघाताची माहिती मिळताच ‘जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान, नाणिज धाम’ची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी धावली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
जखमींची नावे:
1. अनु विनायक कोलमकर, 38 वर्षे
2. अनिल श्रीशंकर सिंग, 38 वर्षे
3. गुंजन अनिल सिंग, 11 वर्षे
4. त्रिशा अनिल सिंग, 8 वर्षे
सर्व रा. दहिसर, मुंबई
सुदैवाने चौघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
मुंबई-गोवा महामार्ग ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’?
मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
