कोकणचे “बुद्धिवैभव” म्हणून ओळखले जाणारे चिपळूणचे दिवंगत पत्रकार आणि `दै. सागर`चे संपादक स्व. निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी यांचे आज स्वातंत्रदिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका) ते पॉवर हाऊस या रस्त्याला नाव देण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या उपस्थितीत नामकरण फलक अनावरणाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र सन्मानाच्या या क्षणीच चिपळूणकरांच्या मनात खंत राहिली. कारण ज्या रस्त्याला नानासाहेब जोशींचे नाव दिले गेले, तोच रस्ता खड्ड्यांनी पोखरला आहे.
अनावरण झालेल्या फलकासमोरच मोठे खड्डे दिसत आहेत. गाड्या खड्ड्यातून जाताना हेलकावे खात आहेत. त्यामुळे “सन्मान करताना किमान रस्ता तरी दुरुस्त करायला हवा होता” अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
चिपळूण आणि संपूर्ण कोकणच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर `दै. सागर`च्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या नानासाहेब जोशींच्या नावाला सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब. पण त्यांच्याच नावाच्या रस्त्यावर आज खड्ड्यांचे साम्राज्य असताना पालिकेने हा रस्ता दुरुस्त करण्याची तत्परता का दाखवली नाही? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पालिकेकडे निधी नव्हता का?
कार्यक्रमासाठी नेत्यांची उपस्थिती, फोटो, भाषणे सगळे झाले. पण रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडे निधी नव्हता का? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाव देणे हा सन्मान आहे, पण त्या नावाला शोभेल असा रस्ता देणे ही देखील जबाबदारी आहे. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याला नाव देण्याआधी तो रस्ता दुरुस्त करणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया शहरवासीय देत आहेत.
