रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. दापोलीतील श्री गोपालकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २ कोटी ६९ लाख ५० हजारांचा तर चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय-निमशासकीय सहकारी पतसंस्थेत ७४ लाख २७ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून एकूण २३ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सहकार विभागाच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दापोली येथील श्री गोपालकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक आणि कर्ज अधिकारी अशा एकूण १३ जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, १५ ऑगस्ट २०२४ रोजी सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक श्रीया जीवन झगडे यांची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीचे सखोल लेखापरीक्षण केले. तपासणीत कोरोना काळात काही व्यक्तींनी आरोग्य विभागात कर्मचारी असल्याचे भासवून खोटे दस्तऐवज तयार करून पतसंस्थेकडून कर्जे लाटल्याचे समोर आले. संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्ज अधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक कर्ज मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या अहवालानंतर श्रीया झगडे यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी प्रसाद सूर्याकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटिया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळूराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बालकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोफट, भिकू रामचंद्र मोरे आणि हसंत आत्माराम कळेकर (मयत) यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना चिपळूण तालुक्यातील असून पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय-निमशासकीय सहकारी पतसंस्थेत ७४ लाख २७ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकारही उघड झाला आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि लिपिकांसह १० जणांविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०१९ ते १२ मे २०२६ या कालावधीत आरोपींनी सभासदांना कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखवले, मात्र प्रत्यक्षात ती रक्कम स्वतःसाठी वापरली. तसेच ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपूनही परत केल्या नाहीत.
रत्नागिरीतील वैभव रामचंद्र ठसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अध्यक्ष संतोष घाडगे, उपाध्यक्ष बाबुराव शिंदे, सचिव अशोक पाटणकर, कार्यकारी सचिव सूर्यकांत शिंदे यांच्यासह ६ सदस्य आणि एका लिपिकावर गुन्हा नोंद झाला आहे. सदस्य धनंजय माने यांचे २०२४ मध्ये निधन झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि ठेवीदार हित संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस करत असून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची शक्यता आहे.
