चिपळूण तालुक्यातील रेहेळ गावणवाडी येथे लावणीच्या कामासाठी लवकर उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून ७१ वर्षीय सासूला सुने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुवर्णा कृष्णा नाचरे, वय ७१, व्यवसाय शेती, राहणार रेहेळ, गावणवाडी, ता. चिपळूण यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, घरात असताना त्यांनी मुलगा दर्शन आणि सून मयुरी यांना “लवकर उठा, शेतात लावणी करायचे दिवस आहेत. अजूनही झोपले आहात, अशाने शेतीची कामे कशी होणार?” असे सांगितले. या बोलण्याचा राग मनात धरून सून मयुरी दर्शन नाचरे हिने फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फाट्याने त्यांच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर वार करून दुखापत केली. त्यानंतर शिवीगाळ करत “बघून घेते” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
