चिपळूण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीदरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, सचिव दीपक शिंदे, खजिनदार संतोष पिलके, ओंकार रेळेकर आणि ललेश कदम उपस्थित होते. पत्रकारांनी चिपळूणच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्न आणि अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यावर सामंत यांनी सकारात्मक चर्चा करून ठोस आश्वासने दिली.
चिपळूणसाठी आतापर्यंत काय झालं?
पालकमंत्री म्हणाले, “यापूर्वीही चिपळूणसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून भरीव कामे झाली आहेत. पालिकेच्या नवीन इमारतीसाठी निधी दिला असून, शहरातील रस्त्यांसाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना नुकतेच 7 कोटी रुपये दिले आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चिपळूणच्या विकासासाठी आमचा हात आखडता घेणार नाही.”
पूर, उद्योग आणि पाण्यावर काय बोलले?
पूर नियंत्रण : यंदा जगबुडी आणि वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे पुराची तीव्रता कमी झाली. नुकसान झालेल्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
एमआयडीसी : पावसाअभावी काही उद्योग संकटात आहेत. मात्र राज्याचा उद्योगमंत्री म्हणून एकही उद्योग बंद पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.
विकासाची मानसिकता : कोणताही प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर जनतेची सकारात्मकता लागते. प्रकल्प आले तर रोजगार आणि आर्थिक सुबत्ता वाढते.
पाणीप्रश्न : मुंबईप्रमाणे रत्नागिरीतही समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवण्याचा प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांनी कोणते मुद्दे मांडले?
शिष्टमंडळाने नगरपालिकेला विकासकामांसाठी निधी, एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणी यंत्रणा, वाशिष्ठी-जगबुडी नदी संगमामुळे होणाऱ्या पाणी निचऱ्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या उपाययोजना आणि पर्यटन विकास या मुद्द्यांवर चर्चा केली. या सर्वांवर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शेवटी चिपळूणच्या विकासासाठी पत्रकार म्हणून आम्हीही सहकार्य करू, असे आश्वासन जर्नालिस्ट असोसिएशनने दिले.
