लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या गुटखा माफिया आणि बनावट औषध विक्रेत्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरात राज्यभरात 70 कोटी रुपयांचा काळा बाजार उघडकीस आणला आहे.
कारवाईची आकडेवारी:
FDA च्या पथकांनी गेल्या एका महिन्यात राज्यभरात तब्बल 904 ठिकाणी छापे टाकले. यात 457 आरोपींना अटक करण्यात आली असून 322 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. तसेच 42 वाहने जप्त करण्यात आली. तपासणीत 29.11 कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा आणि 34.66 कोटी रुपयांचा गुटखा-पान मसाला जप्त करण्यात आला. याशिवाय 5.52 कोटींची बनावट औषधे व वैद्यकीय उपकरणेही ताब्यात घेण्यात आली.
आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले:
या कारवाईवर भाष्य करताना FDA आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात आहे. नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमानाचे व्यवस्थापन नव्हे, तर भावी पिढ्यांना अधिक निरोगी, सुरक्षित आणि सक्षम समाज देणाऱ्या व्यवस्था निर्माण करणे होय.”
“सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे ही कुणावर केलेली कृपा नाही; तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. सार्वजनिक आरोग्य ही केवळ नियामक जबाबदारी नाही; ती मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भेसळ आणि बनावट औषधांच्या परिणामांवर बोलताना मुंडे म्हणाले, “अन्नामध्ये भेसळ होते, औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड होते किंवा नागरिकांची दिशाभूल होते, तेव्हा त्याची किंमत केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित राहत नाही; तर जीवितहानी, विश्वासाचा ऱ्हास आणि समाजाच्या कल्याणावर त्याचा परिणाम होतो.”
भविष्यातील उद्दिष्टांबाबत ते म्हणाले, “आपले ध्येय केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे इतकेच मर्यादित नाही. आपल्याला अशा संस्था उभाराव्या लागतील ज्या विश्वास निर्माण करतील, प्रामाणिकतेला प्रोत्साहन देतील, नवकल्पनांना चालना देतील आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी नागरिकांना ठेवतील. अधिक निरोगी भविष्य विश्वास, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामूहिक जबाबदारी यांवर उभे राहील.”
मकोका लावण्याची तयारी
दरम्यान, मुंडे यांनी सांगितले की, गुटख्याच्या 4 ते 5 प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारीची लिंक आढळली आहे. या प्रकरणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. “आपण आता केवळ सुरुवात केली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
