राज्यातील लाखो मच्छीमार बांधवांच्या हितासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी आज विधानसभेत ऐतिहासिक घोषणा केली. राज्याच्या जलदी क्षेत्रातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आता १ जून ते १५ ऑगस्ट असा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री नीतेश राणे म्हणाले की, “माशांच्या प्रजननासाठी पोषक कालावधी वाढवणे आणि वादळी पावसाळ्यात मच्छीमारांच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे. लहान माशांची होणारी कत्तल थांबवून पुढील पिढीसाठी मत्स्यसाठा टिकवणे गरजेचे आहे.”
का घेतला निर्णय? मच्छीमारांची मागणी
हंगामाच्या सुरुवातीलाच लहान मासे पकडले जात असल्याने अनेक मच्छीमार सहकारी संस्थांनी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.
गुजरातशी एकसूत्रता
शेजारील गुजरात राज्यातही बंदीचा कालावधी जास्त आहे. एकसूत्रता नसल्याने इतर राज्यातील बोटी महाराष्ट्राच्या हद्दीत घुसून बेकायदा मासेमारी करतात. हा प्रकार थांबवण्यासाठी नीतेश राणे यांनी हा निर्णय घेतला.
समित्यांचा सकारात्मक अहवाल
जिल्हा समिती, राज्य सल्लागार व सहनियंत्रण समितीनेही १ जून ते १५ ऑगस्ट बंदीला हिरवा कंदील दिला असल्याचे मंत्री राणे यांनी सभागृहात सांगितले.
सध्याची स्थिती काय होती?
आतापर्यंत केंद्र व राज्याच्या आदेशानुसार १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा बंदी कालावधी होता. यात यांत्रिक व यंत्रचालित नौकांना पूर्ण बंदी असते. आता मंत्री नीतेश राणे यांच्या निर्णयामुळे हा कालावधी १५ दिवसांनी वाढणार आहे.
या निर्णयाचे कोकणातील मच्छीमार संघटनांनी स्वागत केले असून, मंत्री नीतेश राणे यांचे आभार मानले आहेत.
