केंद्र सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेचा फटका आता चिपळूणवासीयांना बसू लागला आहे. नवं घर बांधून राहायला गेलेल्या येथील गणेश उर्फ बाळा ओतारी यांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल 21 हजार रुपयांचं वीज बिलाचा धक्का बसला आहे. आधी सरासरी 2 हजार येणारं बिल स्मार्ट मीटरनंतर थेट 11 हजारांवर गेलं, आणि दोन महिन्यांत 21 हजार भरावे लागले.
काय घडलं नेमकं?
नुकतंच नवं घर बांधून राहायला गेलेल्या गणेश ओतारी यांनी महावितरणकडे नवीन मीटरसाठी अर्ज केला. तेव्हा त्यांच्या घरी नवीन पद्धतीचा ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात आला. पण मीटर बसल्यापासूनच गडबड सुरू झाली.
पहिल्याच महिन्यात 2 हजार ऐवजी 11 हजारांचं बिल आलं. ओतारींनी तात्काळ महावितरण कार्यालयात तक्रार केली. अधिकाऱ्यांनी “पुढच्या महिन्याचं बिल बघू, मग कारवाई करू” असं सांगून वेळ मारून नेली.
पण दुसऱ्या महिन्यातही पुन्हा 11 हजारांचं बिल हात पडताच ओतारी यांच्या पायाखालची जमीन सरकली. 2 महिन्यांत 21 हजार रुपये वीज बिल भरावं लागलं. बिल थकल्याचं कारण देत त्याच क्षणी घराचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला.
ही स्मार्ट मीटर नव्हे, स्मार्ट लूट आहे असा थेट आरोप करत ओतारी यांनी आता मीटर बदलून देण्याची मागणी महावितरणकडे केली आहे.
सर्वसामान्यांचा संताप
ओतारी यांच्या घटनेनंतर चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर विरोधात संतापाची लाट उसळली आहे. “स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची सरळ लूट सुरू आहे. वीज चोरी होणार नाही, पण ग्राहक लुटला जाईल” अशी टीका स्थानिक करत आहेत.
महावितरणकडून अद्याप ओतारींच्या तक्रारीवर ठोस उत्तर मिळालेलं नाही. मीटर बदलून दिला जाईल का, 21 हजारांचं बिल तपासलं जाईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
