सह्याद्रीच्या कुशीत रंगलेल्या अत्यंत रोमहर्षक आणि चित्तथरारक ‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत यंदा देशभरातून जवळपास 400 स्पर्धक सहभागी झाले होते. चिपळूण सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या या प्रतिष्ठेच्या 5व्या पर्वात पुरुषांमध्ये धाराशिवच्या ईश्वर पाटीलने तर महिलांमध्ये पुण्याच्या श्रावणी परिटने विजेतेपद पटकावले.
विक्रमी वेळेत ‘घाटाचा राजा-राणी’
ईश्वर पाटील याने अवघ्या 01:01:13 या आजपर्यंतच्या विक्रमी वेळेत कुंभार्ली घाट सर करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा’ हा मानाचा किताब मिळवला. महिलांमध्ये श्रावणी कृष्णात परिट हिने 1:26:34 वेळ नोंदवत ‘कुंभार्ली घाटाची राणी’चा मान पटकावला. प्रत्येक गटात अवघ्या काही मिलीसेकंदांच्या फरकाने क्रमांक बदलताना दिसले, यावरून स्पर्धेची चुरस लक्षात येते.
दिमाखात पारितोषिक वितरण
सकाळी 6 वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून साहिल डेव्हलपर्सचे सचिन कदम व रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक अमित कवितके यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ झाली. स्पर्धा कुंभार्ली घाट माथ्यावर संपल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत, अनिरुद्ध निकम, जयेंद्रशेठ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे कल्पेश महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेखर निकम यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना चिपळूण सायकलिंग क्लब व स्वयंसेवकांच्या नेटक्या आयोजनाचे कौतुक केले. “राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या या स्पर्धेसाठी स्थानिक नेते व उद्योगांनी सढळ हाताने मदत करावी,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच देशभरातील स्पर्धकांना दरवर्षी वाढत्या सोयी-सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.
गटनिहाय निकाल :
*महिला मास्टर (36+)*: 1. अंजली भलिंगे (पुणे), 2. रुपाली गिरमकर (पिंपरी), 3. ब्लांशे थेमुडो (गोवा)
*महिला एलिट (16-35)*: 1. श्रावणी कृष्णात परिट (पुणे), 2. योगेश्वरी कदम (सांगली), 3. श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर)
*पुरुष किड्स (10-17)*: 1. आर्यन मालगे (कोल्हापूर), 2. आर्यन जाधव (पलूस), 3. साईराज भोईते (सातारा)
*पुरुष ज्येष्ठ (51+)*: 1. महेश किणी (ठाणे), 2. प्रशांत तिडके (पुणे), 3. संतोष पवार (पुणे)
*पुरुष मास्टर (35-50)*: 1. अनुप पवार (मुंबई), 2. संजीव कुमार शर्मा (दिल्ली), 3. श्रधीर शिरझेम (नोएडा)
*पुरुष खुला गट (18-35)*: 1. ईश्वर पाटील (धाराशिव), 2. निहाल नदाफ (सांगली), 3. सिद्धेश पाटील (कोल्हापूर)
यशस्वी आयोजनामागे अनेकांचे हात
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोफळी वीज मंडळ, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, अवनीश, अपरान्त, वालावलकर व परशुराम हॉस्पिटल यांनी रुग्णवाहिका पुरवल्या. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी हायस्कूलच्या 25 विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. शिरगाव हायस्कूलच्या मुलांनी ढोल-ताशांच्या गजरात सायकलिस्टचा उत्साह वाढवला.
सतीश पोद्दार, डॉ. पाटील, भरत माने यांनी शिरगाव पुलापलीकडे हायड्रेशन पॉईंट सांभाळला तर भरत लब्धे यांनी शिरगाव तिठ्ठा येथे पाणी वाटप केले. स्थानिक प्रशासन, नेते, उद्योग व चिपळूणकरांच्या सहकार्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने कृतज्ञता व्यक्त केली.
स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातील उपक्रमांसाठी हुरूप आल्याचे क्लब सदस्यांनी सांगितले.
