दूरदर्शन न्यूज चॅनेलचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांविरोधात चिपळूण पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी शहरातील बहादूरशेख नाक्यात भर रस्त्यावर एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी भागवत यांना बेदम मारहाण केली होती. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले असून ठिकठिकाणच्या पत्रकारांनी या मारहाणीचा निषेध नोंदवून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे
बुधवारी 25 रोजी दूपारी १२.०० वा. चे सुमारास बहादूरशेखनाका चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात उपोषणकर्ते रुपेश सुरेश पवार रा. खेड हे उपोषणाला बसत असताना त्याचे वृत्तांकन करणेसाठी दिपक दिलीप भागवत (पत्रकार) हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांचेसह त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांना १० ते १५ लोकांनी “तु कसला पत्रकार, तु कसले शुटींग करतो” असे बोलून गैरकायदा जमाव करून हाताचे थापटाने व लाथाबुक्यांनी मारहाण तसेच शिवीगाळी व दमदाटी केली. व फिर्यादी यांचे साईड बॅगमधील आयडी व इतर साहित्याची चोरी केली म्हणून फिर्यादी दिपक दिलीप भागवत (पत्रकार) रा. रत्नागिरी यांनी अनोळखी १० ते १५ लोकांचे विरोधात तक्रार दिलेवरून चिपळूण पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ८२२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे क. १८९ (२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधि. २०१७ चे क. ४ प्रमाणे दिनांक २५०३२०२६ रोजी १८.३६ वा. गुन्हा रजिस्टरी दाखल करणेत आलेला आहे. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले साहेब, चिपळूण उपविभाग हे करीत आहेत.. गुन्हा दाखल झाला तरीही अजूनही कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मारहाण करतानाचे चित्रीकरण अवघ्या महाराष्ट्राने पाहिले ज्यामध्ये हल्लेखोरांचे चेहरे पूर्णपणे दिसून येत आहेत. तरीही अजून कुणालाही ताब्यात घेतले गेले नाही. मात्र आमचा तपास चालू असून आरोपीना लवकरच ताब्यात घेऊ असे पोलिसांनी म्हटले आहे.
