चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात उपोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेड येथील रुपेश पवार व रवींद्र पवार या दोघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते (वय २३ रा. चिपळूण) यांनी केली आहे.
फिर्यादी मोहिते यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास बहादूरशेख नाका येथे आपण सरबत आणायला गेलो असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ३ ते ४ लोक बॅनर लावताना दिसले. त्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली तेव्हा त्यापैकी दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून अवमान केला व दम दिला. त्यावेळी तेथे काही लोक जमले व बाचाबाची झाली. तेव्हा आपल्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेली म्हणून फिर्यादी यांनी रुपेश पवार व रविंद्र पवार (दोन्ही रा. खेड) यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. ८३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३५१(२), ३(५), सह अनु. जाती व जमाती अत्याचार प्रति. अधि. १९८९ सुधारित २०१५ चे कलम ३ (१) (आर) (एस) प्रमाणे २५ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३८ वाजता परस्पर विरोधी गुन्हा रजिस्टर दाखल केला अशी माहिती चिपळूण पोलिसांनी दिली. याचा तपास डी. वाय. एस. पी. श्री बेले करत आहेत.
