महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीक्षेत्र आळंदीत परिस्थिती बिकट झाली आहे. इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने आळंदीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2026 मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतला आहे.
आळंदीत काय परिस्थिती आहे?
संस्थानच्या निवेदनानुसार,
– इंद्रायणीवरील पूल आणि आळंदीतील सर्व वाहतूक बंद आहे
– इंद्रायणी पुलावरील कठडे आणि लाईटचे खांब वाहून गेले आहेत
– आळंदी नगरपरिषदेचे वॉटरहाऊस पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अशक्य झाले आहे
– पालखी सोहळ्यासाठी उभारलेली दर्शनबारी पुराच्या पाण्यात वाहून गेली
– मोबाईल टॉयलेट्स, लाईट बंद. तंबू आणि राहुट्यांच्या ठिकाणी चिखल झाला आहे
पालखी प्रस्थानाचा नवा निर्णय
संस्थानने घेतलेल्या निर्णयानुसार, 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पालखी प्रस्थानाचा सोहळा *मर्यादित लोकांमध्ये* संपन्न होणार आहे.
कोणाला प्रवेश
1. रथापुढील दिंड्या- क्र. 1 ते 27
2. रथामागील दिंड्या – क्र. 1 ते 20 (पोटभाग धरून एकूण 56)
– यातील प्रत्येकी 10 वारकरी = एकूण 560 वारकरी
3. परंपरेनुसार – दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी, प्रतिष्ठित यांच्यासह नारळ प्रसादासाठी 400 व्यक्ती
4. मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता सेवक, पोलीस – एकूण 1660 व्यक्तींमध्ये सोहळा पार पडणार
वारकऱ्यांना नम्र आवाहन
संस्थान कमिटीने सर्व वारकरी बांधवांना आवाहन केले आहे की, पाऊस आणि नैसर्गिक परिस्थिती पाहता पालखी प्रस्थानासाठी आळंदीस येऊ नये. पुढील मुक्कामी होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्याबत लवकरच निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल.
देवस्थानाला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देशपांडे आणि विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी म्हटले आहे.
