सततच्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी आज शंकरवाडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जागेवरच चर्चा केली.
शंकरवाडी भागात दर पावसाळ्यात पाणी शिरण्याची समस्या होती. मात्र, नलावडा बंधारा बांधल्यानंतर पाण्याचा वेग आणि पुराचा धोका बराच कमी झाल्याचे सकपाळ यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही.
“पूर कायमचा टाळायचा असेल तर बंधाऱ्यालगत भक्कम संरक्षणात्मक तटबंदी उभारणे गरजेचे आहे. त्याशिवाय प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांची धाकधूक संपणार नाही,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी स्थानिक नागरिकांसह नगरसेवक संजय गोताड यांनीही तटबंदीच्या कामाची तातडीने मागणी केली. दरवर्षी भीतीच्या सावटाखाली जगावे लागत असल्याने कायमस्वरूपी उपाय करावा, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्ष सकपाळ म्हणाले की, “पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून या कामासाठी निधी मिळवून त्याला तातडीने मंजुरी घेऊ. हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.”
चिपळूणला पूरमुक्त शहर बनवणे हे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करताना सकपाळ म्हणाले की, “पूरग्रस्त भागांची नियमित पाहणी, तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन विकासकामे करणे हेच नगरपरिषदेचे धोरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी स्थानिक नगरसेवक संजय गोताड, संदीप भिसे, नगरसेविका हर्षाली पवार यांच्यासह शंकरवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
