खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भूस्खलनानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी सकाळी 6 वाजता घटनास्थळाला भेट दिली.
पालकमंत्र्यांनी भूस्खलन झालेल्या परिसराची पाहणी करून बचावकार्याची आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. डोंगर उतारावरील संभाव्य धोका लक्षात घेऊन शेलारवाडी तसेच आजूबाजूच्या धोकादायक भागात राहणाऱ्या कुटुंबांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांताधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भूस्खलनग्रस्त नागरिकांना तातडीची मदत देण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
