माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील लॉजिंगमध्ये एका तरुणीची निर्घण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सोमवार (दि.20) रोजी घडली असून तरुणीच्या हत्याकांडाने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही हत्या करणारा आरोपी हा रत्नागिरी जिल्ह्यातील असून रायगड पोलिसांनी त्याला नवी मुंबई येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत ओमकार रेसिडेन्सी येथे दि. 20 एप्रिल रोजी रुम नंबर 101 मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. मृत तरुणीचे वय अंदाजे 22वर्षे असून तिची ओळख पटविण्याचे काम तातडीने सुरू झाले. अज्ञात आरोपीने तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून फरार झाला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना मृत तरुणी आणि आरोपीची ओळख पटवण्यामध्ये आता यश आले आहे. पल्लवी मोरे (22) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, माणगाव तालुक्यातील ती वडगाव बौद्धवाडी येथील राहणारी आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. आरोपी तरुण हा रत्नागिरी मधील असून, त्याला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
